
Table of Contents
Toggleशिवाजी महाराजांचा जन्म( Birth of Shivaji Maharaj)
फाल्गुन वद्य तृतिया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी – शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. येथे शकावलीत म्हटल्याप्रमाणे ‘शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुण वद्य तृतिया शुक्रवार नक्षत्र हास्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ या दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले.’
शिवरायांचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ.स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती.
गावेच्या गावे ओस पडली होती.अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत.
जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथीच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती.

शिवाजी महाराजांचे शिक्षण( Education Of Shivaji Maharaj)
क्षत्रियाच्या मुलास जे शिक्षण आवश्यक होते ते शिक्षण शिवाजी महाराजांना स्वाभाविकपणे मिळाले. अश्वारोहण, दांडपट्टा, तलवारीचे हात, नेमबाजी इ. क्षात्रशिक्षण महाराजांस् बालपणी मिळाले.
परंतु महाराजांना लिहिण्यावाचण्याचे शिक्षण मिळाले होते का? असा एक प्रश्न अनेक इतिहासकारांनी उपस्थित केलेला आढळतो. आद्य इतिहासकार, ग्रँट डफ याने महाराजांला अक्षरज्ञान नव्हते असे म्हटले आहे.
ख्यातनाम इतिहासकार, यदुनाथ सरकार याने महाराज हे अकबर, हैदरअली, रणजित सिंह यांच्याप्रमाणे निरक्षर होते असे मत व्यक्त केलेले आहे. महाराजांच्या हस्ताक्षराचा कागद प्रत्यक्षात सापडलेला नसला तरी महाराजांला निरक्षर ठरविणे अन्यायकारक आहे.
कारण महाराजांला लिहितावाचता येत होते हे अप्रत्यक्षपणे सिद्ध करण्यास काही समकालीन पुरावेसुद्धा सापडतात. फॅक्टरी रेकॉर्डमध्ये शिवाजी महाराजांला अक्षरज्ञान चांगले होते याविषयी खात्री देणारे पुरावे आहेत.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचे वडील शहाजी आणि पुत्र संभाजी हे दोघेही संस्कृत भाषेचे जाणकार होते. स्वतः शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’, ‘करण कौस्तुभ’ यासारखे संस्कृत ग्रंथ विद्वानांकडून लिहून घेतले.
शिवभारतकार परमानंद हा तर प्रत्यक्ष महाराजांच्या दरबारात होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर महाराजांना निरक्षर ठरविणे हे निश्चितपणे अन्यायकारक आहे.
शिवभारतमध्ये महाराजांचे लिपीग्रहणयोग्य वय झाल्यावर शहाजी महाराजांनी त्यांना गुरूंच्या स्वाधीन केले असा उल्लेख आलेला आहे.

स्वराज्य कार्यास प्रारंभ
१७ एप्रिल १६४५ रोजी महाराजांनी दादोजी नरसप्रभू देशपांडे यास लिहिलेले एक पत्र उपलब्ध आहे. या पत्रात “हे राज्य व्हावे हे श्रींच्या मनात फार आहे” असा स्पष्ट उल्लेख असून या पत्रातच हिंदवी स्वराज्य हाही शब्द आलेला आहे.
परंतु राजवाड्यासारखे इतिहासकार हे पत्रच संशयास्पद किंवा बनावट मानतात. शिवाय महाराजांच्या दुसऱ्या कोणत्याही पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा शब्द आलेला नाही.
परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, १६४५ पासून महाराजांच्या मनात स्वतंत्र राज्याची कल्पना आकार घेऊ लागली होती. २८ जानेवारी १६४६ या तारखेचे महाराजांचे न्यायनिवाडाविषयक एक पत्र उपलब्ध असून ह्या पत्राच्या शिरोभागी शिवाजी महाराजांची मुद्रा आढळते.
प्रतिपच्चंद लेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
पत्राच्या अखेरीस ‘मर्यादेयं विराजते’ ही दुसरी मुद्रा दिसून येते.
महाराजांची उपरोक्त मुद्रा म्हणजे त्याच्या स्वराज्य कार्याचा प्रारंभ झाल्याची साक्ष आहे. अस्सल पुराव्यांची छाननी केल्यास १६४७ पासून महाराजांनी स्वराज्यकार्य द्रुतगतीने सुरू केलेले आढळते. ७ मार्च १६४७ रोजी दादोजी कोंडदेव यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहाजी महाराजांच्या जहागिरीची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराजांवर आली.
स्वतंत्र वृत्तीच्या महाराजांनी स्वराज्य स्थापण्याचा धाडशी उद्योग हाती घेऊन आदिलशहासारख्या शत्रूना आश्चर्यचकीत केले. १६४७मध्ये तोरणा आणि राजगड हे दोन किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले.
१६४७च्या दिवाळीत पुरंदरचा किल्लाही मोठ्या कौशल्याने आपल्या वर्चस्वाखाली आणला. याचवर्षी पुण्याचा हवालदार आणि सिंहगडचा किल्लेदार यांच्याशी स्नेह जोडून महाराजांनी कोंढाणा उर्फ सिंहगड हा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला. अशाप्रकारे केवळ एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड हे चार महत्त्वाचे किल्ले महाराजांनी ताब्यात घेतले.
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एक प्रसंग : अफझल प्रसंग

विजापूर दरबाराने अफझलखानाची हेतुपुरस्सर नेमणूक केली. त्याकाळात आदिलशहाच्या दरबारात जे काही मोजके नामवंत सरदार होते त्यामध्ये अफझलखानाचा क्रमांक वरचा होता.
शिवाय अफझलखान हा प्रथमपासून महाराजांचा द्वेष करीत होता. जावळीवर महाराजांनी वर्चस्व निर्माण केले ही गोष्ट खानाला अजिबात आवडली नाही. खान महाराजांचाच नव्हे तर शहाजी महाराजांचाही द्वेष करीत असे.
शहाजीला महाराजांना कर्नाटकातून पायात बेड्या घालून विजापूरच्या दरबारात आणण्यामध्ये खानानेच पुढाकार घेतला होता. कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत महाराजांचा भाऊ संभाजी हा मारला गेला, या घटनेलाही खानाची कारवाई कारणीभूत होती.
अशाप्रकारे खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. म्हणूनच महाराजांला पकडण्याचा विडा त्याने विजापूरच्या दरबारात उचलला. ‘तारिखे अली’चा कर्ता रुहूल्ला लिहितो की, “बादशहाने अफझलखानाला जातेवेळी सांगितले होते की, महाराजांनी वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकूल न ऐकता त्याचा नाश करावा.
डच पत्रव्यवहारामध्येही महाराजांचा नाश करण्यासाठीच विजापूर दरबाराने अफझलखानाची नेमणूक केली होती असा स्पष्ट उल्लेख आढळतो.

अफझलखानाचा वध
खान आणि महाराज यांच्या वकीलांनी भेटीगाठी घेऊन भेटीची तारीख १० नोव्हेंबर १६५९ ही निश्चित केली. शिवाजी महाराज आणि खान यांच्या भेटीचा संपूर्ण तपशील दोन्ही वकिलांनी ठरविला. प्रतापगडाच्या माचीवर मार्गशिर्ष
शु. ।। सप्तमी, गुरुवार, १० नोव्हेंबर १६५९ रोजी मध्यान्हाच्या वेळी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट होईल असे ठरविण्यात आले आणि त्यावेळी दोघांजवळ प्रत्येकी दोन सेवक राहतील, प्रत्येकाचे १० अंगरक्षक बाणाच्या टप्प्यापलीकडे उभे रहातील, दोघांनीही सशस्त्र यावे असा तपशील ठरविण्यात आला व तो दोघांनाही मान्य झाला.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी मध्यान्हाच्यावेळी अफझलखान प्रतापगडच्या माचीवर येऊन पोहचला. महाराजांनीही खानाच्या भेटीची तयारी केली.
स्वसंरक्षणासाठी त्यांनी चिलखत आणि शिरस्त्राण घातले. एका हातात पट्टा आणि दुसऱ्या हातात कृपाण अशी दोन शस्त्रे महाराजांनी घेतली. जिऊमहाला आणि संभाजी कावजी हे दोन हुद्देकरी बरोबर घेतले. खानाच्या बरोबरही दोन हुद्देकरी होते पण त्याशिवाय सय्यद बंडा हा धारकरीही होता. शिवाजी महाराजांनी हरकत घेतल्यावर सय्यद बंडाला मंडपाबाहेर पाठविण्यात आले.
प्रतापगडच्या माचीवर खानासाठी मोठा शामियाना उभारण्यासाठी सांगण्यात आले होते. या शामियान्यातच शिवाजी महाराज व अफझलखान यांची भेट होणार होती. ठरल्याप्रमाणे भर मध्यान्हाच्या वेळी महाराजांनी खानाला भेटण्यासाठी शामियान्यात प्रवेश केला. शिवाजी महाराजांला पहाताच खानाने आलिंगन देण्यासाठी हात पसरविले.
महाराज अत्यंत सावधपणे पुढे गेले. खानाने शिवाजी महाराजांना बाहुपाशात घेऊन त्याचे मस्तक काखेत दाबून धरले. त्यानंतर खानाने महाराजांच्या डाव्या कुशीत जमदाड (खंजीर) खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु अंगात चिलखत असल्यामुळे तो वार महाराजांला लागला नाही.
यावेळी सावधचित्त असलेल्या शिवाजी महाराजांनी मोट्या चपळाईने आपली मान सोडवून घेतली आणि आपल्या हातात असलेली कृपाण खानाच्या पोटात खुपसून त्याचा वध केला. खानाच्या सेवकाने शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा वार चुकवून शिवाजी महाराजांनी त्याला ठार मारले.
खान पडल्याचे लक्षात येताच सय्यद बंडा हा मोठ्या त्वेषाने धावून आला. पण जीऊमहालाने त्याला मध्येच अडवून ठार केले.
खानाचा वध झाल्यावर शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरून इशारतीच्या तोफा डागल्या.

आपण शिवाजी महाराजांना ओळखतो का? त्यांच्याकडून आपण काय शिकावे?
शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले म्हणून ते फार थोर होते असे म्हणता येणार नाही. राज्य स्थापन करून राज्याचा विस्तार केला हे त्यांच्या पराक्रमाचे लक्षण आहे. व त्याचबरोबर आपल्या राज्यातील रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारा महान पुरुष म्हणून शिवाजी महाराजांची योग्यता मोठी होती. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा आपल्या राज्यातील साधुसंतांना आणि स्त्रियांना काडीचाही उपद्रव लागू नये म्हणून अत्यंत प्रयत्नशील होता. परमुलुखातील स्त्रियांना आणि बालकांना उपद्रव देणाऱ्या आपल्या सैनिकाची गय केली जाणार नाही. व तसे स्पष्ट आदेश त्यांना देण्यात आलेले होते. ‘परमुलुखात बायका पोरं जो धरील त्याची गर्दन मारली जाईल’ हे शिवाजी महाराजांचे ब्रीदवाक्य होते. महाराजांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक धोरणाचा आढावा घेतल्यास लोककल्याण हेच त्यांच्या धोरणाचे मूलतत्त्व होते असे दिसून येते.
ह्या ब्लॉगमध्ये लिहिलेली बरीचशी माहिती प्र न देशपांडे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज ह्या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. तर असेच अन्यन्य साधारण किस्से तुम्हाला वाचायचे असल्यास तुम्ही येथे निश्चित क्लिक करावे!!