Table of Contents
Toggleजन्मत: महामानव | डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध | BABASAHEB INFORMATION IN MARATHI

बाबासाहेब आंबेडकर इतिहास
जगात महामानवाला महामानवाच्या रूपातच जन्म घ्यावा लागतो. म्हणूनच पुढे तो आपल्या गुणसंपन्न व्यक्तित्त्वाने आणि महान कर्तृत्वाने महामानव सिद्ध होतो. जगाच्या अशा नियमानुसारच दि. १४ एप्रिल १८९१ ला मध्यप्रदेशात महू येथे महाराष्ट्रीय पिता रामजी आणि माता भीमाबाई यांच्या पोटी चौदावे अपत्य म्हणून महामानवाच्या रूपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला.महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन, व्यक्तित्व आणि कर्तृत्व भारत राष्ट्राच्या, अखिल जगाच्या आणि विश्वात्मक मानवतेच्या कल्याणकारी इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिले जावे, अशाच महान योग्यतेचे आहे.

आंबेडकरांकडे किती डिग्री होत्या?
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या देदीप्यमान पुरुषार्थाचा आदर, गौरव आणि सन्मान वाढविणाऱ्या बी.ए., एम. ए., पीएच.डी., एम. एस्सी., डी. एस्सी., बार-अॅट-लॉ, एलएल.डी. आणि डी. लिट. या त्यांच्या थोर पदव्या जणू मनमोहक सौंदर्य खुलवीत राहणाऱ्या सोन्याच्या रत्नजडित अलंकारांप्रमाणे आहेत, असे समजून कोणताही सुज्ञ मनुष्य आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहणार नाही!
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दि.५ जून १९५२ रोजी अमेरिकेत न्यूयॉर्क येथे कोलंबिया विद्यापीठाने एलएल. डी. ही प्रतिष्ठेची पदवी प्रदान करून आपल्या विख्यात माजी विद्यार्थ्याला सन्मानित केले आणि भारतातही आंध्र प्रदेशातील हैद्राबाद येथे उस्मानिया विद्यापीठाने दि. १२ जानेवारी १९५३ रोजी डी. लिट. ही सर्वोच्च पदवी प्रदान करून समारंभपूर्वक गौरविले.
अशा या दोन सन्माननीय पदव्या सोडल्या तर अन्य सहाच्या सहा पदव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय जिद्दीने, चिकाटीने आणि कष्टाने शिक्षण घेऊन प्राप्त केल्या आहेत.

बाबासाहेब आंबेडकर कोणत्या जातीचे होते?
विसाव्या शतकाच्या आरंभीच्या तीन दशकांत देशातील आणि परदेशांतील विद्यापीठांच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ पदव्या प्राप्त करीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च विद्याविभूषित होण्याचे आणि महाज्ञानी होण्याचे भाग्य ज्या परिस्थितीमुळे लाभले ती परिस्थिती जाणून घेणे निश्चितच अतिशय महत्त्वपूर्ण, कुतूहलवर्धक आणि आश्चर्यकारक आहे!
ज्या काळात भिन्न भिन्न जातींमध्ये विभागलेल्या आणि जातीला आधार मानून उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य, मंगळ अमंगळ असा भेदभाव पाळणाऱ्या हिंदू समाजात महार इत्यादी ब्राह्मणेतर जातींच्या लोकांना शाळेत शिक्षण घेण्याची सर्वप्रकारची बंदी होती, त्या काळात महार जातीच्या सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
जन्म जरी महार कुटुंबात झाला, तरी कार्य संपूर्ण भारतातील लोकांसाठी केले तेही जातिभेद न करता. आपण सर्वांनी हेच लक्षात घ्यायला हवे की त्यांच्या ह्या लढाईचे कारणच मुळात जातिभेदाची व्यवस्था होती.


आंबेडकरांचे मूळ आडनाव काय आहे? व मूळ गाव
महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दापोलीजवळ (मंडणगडजवळ) पाच मैलांवर असलेले ‘आंबावडे’ नावाचे एक लहानसे खेडे सुभेदार रामजी यांचे मूळ गाव होते. त्या गावात सुभेदार रामजी यांचे मूळ आडनाव ‘सकपाळ’ असे होते. पण पुढे रामजी यांनी आपल्या ‘आंबावडे’ या गावाच्या नावावरून ‘सकपाळ’ या मूळ आडनावाच्या ऐवजी ‘आंबावडेकर’ असे नवीन आडनाव धारण केले होते.

आंबेडकरांच्या किती बायका आहेत?आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचे काय झाले?
बाबासाहेबांची 2 लग्ने झाली होती. भीमराव आपल्या १४व्या वर्षी मुंबईत ‘एल्फिन्स्टन हायस्कूल’ मध्ये इंग्री पाचवीच्या वर्गात शिकत होते. त्याचवेळी वडील रामजींनी रमाबाई नावाच्या १० वर्षांच्या सुंदर मुलीबरोबर भीमरावांचे लग्न केले. लग्न झालेल्या दिवसापासून ते बी.ए., एम.ए., पीएच.डी., एम. एस्सी., डी. एस्सी., बार-अॅट-लॉ या सर्व पदव्या मिळवेपर्यंत भीमराव विद्यार्थीही आणि गृहस्थही बनून राहिले. गृहस्थाच्या जबाबदारीत गुंतून सुद्धा बार-अॅट-लॉ ही बॅरिस्टरीची अंतिम पदवी प्राप्त करेपर्यंत त्यांनी आपली विद्यार्थी दशा चालूच ठेवली, हे विद्यार्थी भीमरावांचे रचनात्मक मोठेपण आहे. त्यांनी गृहस्थीपुढे आपल्या विद्यार्थी दशेला बळी जाऊ दिले नाही.

आंबेडकरांनी सविताशी लग्न का केले?
1947 च्या डिसेंबर महिन्यात बाबासाहेब मुंबईत आले असताना, डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. तिथून तपासणी करून बाबासाहेब दादारमधील राजगृहात जाणार होते. माईसाहेब दादरमध्येच पोर्तुगीज चर्चसमोर राहत असत. त्यामुळे बाबासाहेबांनी विचारलं की, “चला तुम्हाला दादरला घरी सोडतो. मलाही राजगृहाला जायचं आहे.”
याच दिवशी बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले, “हे पाहा डॉक्टर, माझे लोक व सहकारी मला आग्रह करत आहेत की सहचारिणी करा. परंतु, मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे. अशावेळी काळजी घ्यायला कोणी तरी असणे आवश्यक आहे. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे, मी तुमच्यापासूनच सुरू करतो.”
हे ऐकल्यावर माईसाहेब संकोचल्या आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही. बाबासाहेबांनी तातडीनं उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले.
नंतर 25 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतून माईसाहेबांच्या नावे एक पत्र आलं. ते बाबासाहेबांचं पत्र होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, ‘मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात तुझ्यापासूनच सुरू करीत आहे. अर्थात, जर तू तयार असशील तरच! तरी तू याचा विचार करून मला कळव’
पुढे याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की, ‘तुझ्या नि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी, या कारणांनी तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकूल दु:ख होणार नाही.’
दरम्यानच्या काळात माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या. त्यांनी आधी डॉ. मालवणकरांशी चर्चा केली. डॉ. मालवणकर म्हणाले की, “आंबेडकरांनी जबरदस्ती केली नाहीय, त्यामुळे शांतपणे विचार करून योग्य काय ते तुम्ही स्वत:च ठरवा.”
डॉ. मालवणकरांनीही निर्णय माईसाहेबांवरच सोडला. मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या आणि मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं.
त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले, “म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर! अजिबात नकार देऊ नकोस. पुढे जा.”
भावाच्या वाक्यांनी माईसाहेबांना आधार मिळाला आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला.
‘लग्नासाठी होकार देऊन दीन-दलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती,’ असं माईसाहेब आत्मचरित्रात म्हणतात.
प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेब आंबेडकरांचे पुत्र आहेत का?
प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवंत राहिलेले एकुलते एक अपत्य म्हणजे यशवंतराव होते. अशा आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाला हजर राहू न शकल्याची व्यथा त्यांच्या अंतःकरणात होती. त्यांची ती व्यथाच यशवंतरावांच्या मुलाला म्हणजेच नातू प्रकाशला गोंजारताना आनंद बनून व्यक्त होत होती. छोटा नातू ‘प्रकाश’ आजोबा म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचाच एक महत्त्वाचा घटक होता. तो ‘प्रकाश’ आंबेडकर कुटुंबाचा होतकरू भविष्यकाळ होता. म्हणूनच डॉ. आंबेडकर यांनी छोटा नातू प्रकाशला आनंदाने गोंजारणे, याला विशेष अर्थ आहे.
डॉ. आंबेडकर यांना त्यांच्या लहानपणी आपल्या कुटुंबात सर्वांकडून प्रेमच प्रेम अनुभवण्यास मिळाले. त्या प्रेमरूप सुसंस्काराचा उत्तम परिणाम म्हणूनच स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘कुटुंबप्रेमी नेता’ होण्यात यशस्वी झाले होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य
नक्कीच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा सारांश चार बुलेट पॉईंट्समध्ये खालीलप्रमाणे:
अस्पृश्यांसाठी राजकीय हक्कांसाठी लढा:
साउथबरो मताधिकार समितीला साक्ष देऊन आणि निवेदन सादर करून अस्पृश्यांना मतदानाचा हक्क, निवडणुकीत उमेदवारी, स्वतंत्र मतदारसंघ आणि लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
समाजजागृती आणि शिक्षणाचे महत्त्व:
अस्पृश्य समाजाने शिक्षण घेऊन स्वतःचा आणि कुटुंबाचा विकास करावा, यासाठी जनजागृती केली.
“मूकनायक” वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण केली.
अस्पृश्य समाजासाठी राजकीय प्रतिनिधित्व:
अस्पृश्य समाजाला राजकीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत, यावर त्यांनी भर दिला.
सामाजिक न्यायासाठी संघर्ष:
लॉर्ड किचनेरने १८९१ मध्ये अस्पृश्यांची लष्करात भरती होऊ नये, असे धोरण स्वीकारले होते. त्या विरोधात लढून अस्पृश्यांना पुन्हा लष्करात भरती होण्याचा हक्क मिळवून दिला.
माणगाव परिषदेचे अध्यक्षपद भूषवून अस्पृश्य समाजाच्या हितासाठी महत्त्वाचे कार्य केले.

आंबेडकर कायदा मंत्री कसे झाले?
स्वतंत्र व सार्वभौम भारत राष्ट्राची राज्यघटना तयार करण्याचे काम करावयाचे होते. जात,पंथ, वेश,धर्म इत्यादी भेद विचारात न घेता स्वतंत्र व सार्वभौम भारताच्या सर्व जनतेचे हित साधणारी राज्यघटना तयार करावयाची होती. सर्वांचीच जबाबदारी वाढली होती.
मुंबई विधिमंडळाच्या काँग्रेस सभासदांतर्फे घटना समितीचे सभासद म्हणून निवडून आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आणि उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या मंत्रिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान दिले आणि त्यांच्यावर कायदा खात्याची जबाबदारी सोपविली. त्यामुळे डॉ. आंबेडकर घटना समितीचे सभासदही झाले आणि स्वतंत्र व सार्वभौम भारत राष्ट्राचे पाहिले विधिमंत्रीही झाले. विधिमंत्री या नात्याने त्यांची घटना समितीवरची जबाबदारी वाढली होती.
२० ऑगस्ट १९४७ रोजी घटना समितीच्या अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्या संबंधीच्या सर्व कायदेशीर गोष्टी यांचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले आणि त्या समितीच्या सभासदांची नावेही जाहीर केली- डॉ. बी. आर. आंबेडकर, जी.व्ही. मावळणकर, पुरुषोत्तमदास टंडन, गोपालस्वामी अय्यंगार, विधनचंद्र लाल मित्र, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि हुसेन इमाम.

बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा का दिला?
डॉ. आंबेडकर विधिमंत्री म्हणूण हिंदू कोड कायदेशीर भाषेत तयार करण्याची जबाबदारी सांभाळीत होते. त्यासाठी काळजीपूर्वक परिश्रम होते. ‘हिंदू संहिता’ (Hindu Code) अतिशय व्यवस्थित तयार व्हावी, डॉ. आंबेडकर प्रत्येक कलम नीट तपासून, पुनःपुन्हा लिहून काढीत, अशाप्रकारे त्यांनी परिश्रमपूर्वक हिंदू कोड बिल तयार केले आणि वारसाहक्क विवाह या दोन विषयांच्या बाबतीत हिंदू स्त्रियांना जास्तीत जास्त संरक्षण अशी व्यवस्था केली.
हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो लोकसभेपुढे मांडण्याची संमती पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अन्य नेत्यांनी दिली. लोकसभेत “दि कोड बिल” मांडले जाणार असे माहीत होताच हिंदू समाजातील प्रतिगामी विचारी लोक प्रचंड विरोध करू लागले. डॉ. आंबेडकरांनी विरोधकांना जाहीर सभांमधून व खासगी चर्चामधून उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. पं. नेहरूंनीही जाहीर सभांमधून सांगितले. ‘काही झाले तरी हिंदू कोड बिल आम्ही मंजूर करणारच परंतु विरोधकांच्या विरोधाचा जोर वाढतच चालला. याबाबतीत विचारविनियम करण्यासाठी ७ आणि १३ सप्टेंबर १९५१ रोजी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठका झाल्या पण हे बिल मंजूर करून घेण्याच्या बाबतीत एकमत झाले नाही. घटस्फोट, एकपत्नीव्रत, स्त्रियांना समान हक्क हे विषय वादाचे विषय बनले.
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार १९५२ ची सार्वत्रिक निवडणूक जवळ येत चालली होती. हिंदू समाजाचा विरोध लक्षात न घेता हे बिल मंजूर केले गेले, तर काँग्रेस पक्षाला हिंदू समाजाची मते मोठ्या प्रमाणात मिळणार नाहीत आणि त्याचा वाईट परिणाम म्हणून काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागेल. असे होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाने हे बिल १९५२च्या निवडणुकीने जी लोकसभा तयार होईल, त्या लोकसभेपुढे मांडण्याचा व मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला. परंतु विधिमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल ज्या स्वरूपात तयार केले होते, त्याच स्वरूपात ते लोकसभेच्या सप्टेंबर १९५१ च्या अधिवेशनातच मंजूर करून घेण्यात यावे, असा आग्रह करू लागले.
पण काँग्रेस पक्ष चालू अधिवेशनात ते बिल मंजूर करून घेण्यास तयार झाला नाही. त्यामुळे डॉ. आंबेडकर खूप दुखावले गेले. त्यांनी विधिमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा विचार केला.

संविधान लिहिण्यासाठी आंबेडकरांची निवड का करण्यात आली? नेहरूंनी डॉ. आंबेडकरांना कायदा मंत्री म्हणून का निवडले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीचे सभासद करण्यात आले. त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री (Minister of Law) करण्यात आले आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे त्यांना घटना तयार करणाऱ्या मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले. हे मोठमोठे मान-सन्मान त्यांना त्यांच्या व्यासंगी ज्ञानी भाषानिपुण, विषयविवेचननिष्णात व राष्ट्रप्रेमी व्यक्तिमत्त्वाच्या उज्ज्वल वैशिष्ट्यांमुळेच मिळाले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व असाधारण होते, लोकोत्तर होते।
(१) डॉ. आंबेडकर यांना कायद्याचे आणि घटनेचे अगाध ज्ञान होते. त्यांनी इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड अशा निरनिराळ्या देशांच्या कायद्याचा आणि घटनांचा सविस्तर अभ्यास केला होता. त्यांनी कायदाविषयक आणि घटनाविषयक सुप्रसिद्ध आणि महत्त्वपूर्ण ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यांनी थोर थोर विचारवंतांच्या जीवनविषयक विविध विषयांवरच्या ग्रंथांचा सखोल अभ्यास केला होता. त्यांनी हिंदुस्थानसंबंधीच्या १९३५ चा कायदा तयार केला जात असताना आपल्या घटनाविषयक ज्ञानाच्या जोरावर समाजहिताच्या आणि देशहिताच्या दृष्टीने महत्त्वाचा सहभाग घेतला होता. त्यांचे सर्व ज्ञान घटनेचा मसुदा तयार करताना निश्चितच त्यांना उपयोगी पडणारे होते.
(२) डॉ. आंबेडकर यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. घटनेचा मसुदा इंग्रजी भाषेतच तयार करावयाचा होता. ते बोलण्यासाठी आणि लेखन करण्यासाठी इंग्रजी भाषेचा हवा तसा वापर करण्यात वाकबगार होते. अपेक्षित परिणाम साधला जाऊ शकेल अशा पद्धतीनेच ते इंग्रजी भाषेचा उपयोग मोठ्या कौशल्याने करीत होते. ग्रंथांच्या विषयांना शोभेल अशीच इंग्रजी भाषा वापरून त्यांनी आपले ग्रंथ लिहिले होते. तसेच कायद्याला अनुकूल इंग्रजी भाषेचा उपयोग करण्याचेही त्यांच्याकडे कौशल्य होते. त्यांचे अशा प्रकारचे इंग्रजी भाषेवरचे प्रभुत्वही घटनेचा मसुदा लिहिताना अतिशय उपयोगी पडणारे होते.
(३) विषयाचे मुद्देसूद विवेचन व लेखन करण्यातही डॉ. आंबेडकर अगदी चतुर होते. हे त्यांनी मार्मिक ग्रंथलेखन करून सिद्ध केलेलेच होते. त्यांनी एम. ए., पीएच.डी., एम. एस्सी., डी.एस्सी. या उच्च पदव्यांचे शिक्षण अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात आणि इंग्लंडमधील लंडन विद्यापीठात घेत असताना इंग्रजी भाषेत संशोधनात्मक ग्रंथलेखन केलेले होते. त्या ग्रंथांमध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयाचे मुद्देसूद, साधार आणि नवीन दृष्टिकोनानुसार विवेचन केलेले होते, म्हणूनच ते त्या उच्च पदव्या मिळविण्यात यशस्वी झाले होते. त्यानंतर त्यांनी समाज, मानववंश, धर्म, राजकारण इत्यादीशी संबंधित विषयांवरही उत्तम इंग्रजी भाषेत उत्कृष्ट ग्रंथ लिहिलेले होते आणि लिहीतही होते. डॉ. आंबेडकर यांचे उत्तम इंग्रजी भाषेत मुद्देसूद, साधार आणि नवीन दृष्टीकोनानुसार विषयाचे विवेचन करीत बहुविध विषयांवर ग्रंथलेखन करणे, हे स्वतंत्र भारताच्या घटनेचा मसुदा तयार करताना आणि लिहिताना अतिशय उपयोगी पडणारे होते.
(४) डॉ. आंबेडकर यांच्या प्रखर राष्ट्रप्रेमी आणि महान देशभक्त असण्याविषयी अढळ विश्वास निर्माण झाला होता. त्यांनी १७ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीत जे दूरदृष्टीचे भाषण केले होते, त्या भाषणात त्यांनी हिंदुस्थानच्या विघटनात सर्वांचेंच नुकसान आहे, असे समजावून स्पष्टपणे सांगितले होते, की अखंड हिंदुस्थानातच सर्व जातींच्या, पंथांच्या आणि धर्माच्या लोकांचे हित आहे. आपल्या अशा सकारात्मक भूमिकेमुळेच डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यांच्या हितासाठी कधीही हिंदुस्थानच्या विघटनाची मागणी केलेली नव्हती. म्हणून विश्वासपूर्वक वाटत होते, की डॉ. आंबेडकर स्वतंत्र भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अशा विविधांगी उन्नतीचे अधिष्ठान होऊ शकेल, अशीच राज्यघटना निर्माण करू शकतील आणि स्वांतत्र्य, समता, बंधुत्व आणि लोकशाही या जीवनमूल्यांना केंद्रस्थानी ठेवूनच लोकहितकारी व देशहितकारी राज्यघटना तयार करण्यात अवश्य यशस्वी होतील.
DR.BABASAHEB AMBEDKAR INFORMATION IN MARATHI

सारांश
डॉ. भीमराव रामजी तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची तेजस्वी व विजयी जीवनयात्रा म्हणजे एका जन्मजात, स्वयंभू, बुद्धिमान, कर्तुत्ववान आणि थोर विचारवंत अशा महामानवाची जनकल्याणकारी राष्ट्रहितकारी, अवघ्या मानवतेच्या भल्याची, निस्वार्थ त्यागाची आणि सार्थक समर्पणाची जीवनयात्रा होती, ते अखेरपर्यंत आपल्या जीवितकार्यात मनापासून रममाण होते. म्हणूनच डॉ. आंबेडकरांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठाने एलएल. डी. ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले; भारतातील हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने डी.लिट. ही सन्मानाची पदवी देऊन गौरविले आणि भारत सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार मरणोत्तर देऊन गौरविले. खरोखर, डॉ. भीमराव रामजी तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वार्थाने महामानवच होते !
जगात ज्या प्रकारच्या सद्गुणसंपन्नतेमुळे मानव ‘महामानव’ म्हणून सिद्ध होऊ शकतो; त्या प्रकारच्या सद्गुणसंपनन्नतेमुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘महामानव’ म्हणून सिद्ध होऊ शकले आहेत !
जगात ज्या प्रकारच्या श्रेष्ठ धैर्याने व अतुल शौर्याने अपयशावरही मात करून मानव लोककल्याणाच्या व देशहिताच्या सत्कार्यात विजयी होऊन ‘महामानव’ सिद्ध होतो; त्या प्रकारच्या श्रेष्ठ धैर्याने व अतुल शौर्याने अपयशावरही मात करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोककल्याणाच्या व देशहिताच्या सत्कार्यात विजयी होऊन ‘महामानव’ सिद्ध झाले आहेत !