Linkedin सारख्या जॉब मिळवण्याच्या कोणत्याही Apps किंवा पोर्टलवर ‘Project Manager’ सर्च केला की L&T, TCS, Infosys, Accenture, Wipro, IBM, Capgemini, Tech Mahindra अशा एकापाठोपाठ मोठ्या मोठ्या कंपनीच्या नावांची लिस्ट दिसण्यास सुरुवात होते. आजच्या दिवसांमध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन IT, कन्स्ट्रक्शन, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स असे अनेक जॉब रोल्स पाहायला व ऐकायला मिळतात.
तर इतका महत्त्वाचा असलेला रोल म्हणजे “प्रोजेक्ट मॅनेजर” आहे तरी काय? ते काय करतात? त्यापैकी एक तुम्ही कसे बनाल? या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेत आम्ही तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रोजेक्ट मॅनेजर एखाद्या कंपनीसाठी किती महत्त्वाचा असतो याची स्पष्टता जितक्या चांगल्या प्रकारे देता येईल तितका आम्ही भर दिला आहे. तर पुढील सोप्या भाषेतील गोष्ट नक्की वाचा.
Table of Contents
Toggleकोणाला म्हटले जाते प्रोजेक्ट मॅनेजर? |Who is called a project manager?
तर मित्रांनो, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून आराम मिळण्यासाठी आपण बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन नक्कीच करतो. तर मग सुरुवात होते फिरायला जाण्याचे ठिकाण शोधण्यापासून, त्यानंतर मग फिरायला जाण्याची तारीख, वेळ, ट्रिपचा बजेट, ट्रेन/बस/ गाड्यांची बुकिंग, राहण्याची जागा, खाण्याचे ठिकाण या सर्व गोष्टी एका पाठोपाठ एक करण्यास सुरुवात होते. पण हे सर्व करण्यासाठी ग्रुप मधील सगळेच काम करत नाहीत तर आपल्यामधील काहीजण स्वतः पुढे येऊन हे सर्व पाहण्याची जबाबदारी घेतात.
ही झाली ट्रीप ची प्लॅनिंग पण नंतर जेव्हा ट्रीप निघते तेव्हा एकमेकांसोबत कम्युनिकेशन, सर्व बजेटमध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न, ट्रिप मध्ये काही छोटे-मोठे प्रॉब्लेम्स आले जसे की फ्लाईट कॅन्सलेशन किंवा गाडीमधील तांत्रिक बिघाड, एखाद्या ठरवलेल्या राहण्याच्या ठिकाणी नसलेली जागेची उपलब्धता किंवा रेस्टॉरंट मधील गर्दी तर अशावेळी जागोजागी तोडगा काढून सर्व काही व्यवस्थित ठेवण्याचे प्रयत्न हे करत असतात.
तर या छोट्याशा नेहमीच्या उदाहरणावरून इतके तर तुम्हाला लक्षात आले असेल की ही ट्रिप म्हणजे एक प्रोजेक्ट आणि स्वतः जबाबदारी घेणारे आपले सहकारी किंवा मित्र म्हणजे Project Manager.
सोप्या भाषेत Project Manager म्हणजे फॅमिली ट्रिपचा मॅनेजर, सर्व माणसांना नीटपणे हाताळणारा, कल्पनेमधील कृती सत्यात उतरवणारा, सर्व माणसांसोबत कम्युनिकेशन साधणारा, सर्वांच्या इच्छे प्रमाणे व्यवस्थित रिझल्ट मिळवून देणारा, टीमने काम केलेले किती चांगले होईल, टिकेल आणि फायदा करून देईल याची खात्री देणारा एकूणच प्रोजेक्ट मॅनेजर हा प्रोजेक्टचा CEO असतो असे बोलणे काही वावग ठरणार नाही.
आजच्या जगातील बिझनेस आणि ऑर्गनायझेशन्स/कंपन्या वेगाने स्वतःला बदलत आहेत कारण ज्या जगात त्या आहेत ते जग खूपच वेगवान झाले आहे. नवीन कायदे आणि नियम, नवीन ट्रेंड्स आणि इंटरेस्ट, नवीन टेक्नॉलॉजी, काम करण्याची पद्धत आणि जुन्या संकल्पना आजच्या काळातील नवीन मार्गांनी पुन्हा जन्म घेत आहेत.
मोठमोठ्या कंपनींना बदलत राहणे आणि स्वतःमध्ये एक व्हॅल्युएबल चेंज घडवत राहणे गरजेचे झाले आहे कारण जर त्यांनी असे केले नाही तर ते तिथेच अडकून जातील किंवा इतकंच काय तर ते मार्केट मधून अदृश्य सुद्धा होऊ शकतात (जसे की Nokia –स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवून न आणल्यामुळे काही काळाने अदृश्य झालेली कंपनी). त्यामुळे बदल हाच प्रगतीचा एक महत्वाचा constant आहे.
प्रोजेक्ट मॅनेजर कौशल्ये|What skills are necessary for Project Manager job
Project Manager ला व्यवस्थित रीतीने आणि अगदी पारदर्शक पद्धतीने काम करावे लागते. पारदर्शक म्हणजे प्रोजेक्ट कुठे प्रगती करत आहे आणि कुठे प्रॉब्लेम्स ना सामोरे जात आहे हे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावे लागते. एका प्रोजेक्ट मॅनेजर कडून निरनिराळ्या कंपनीच्या निरनिराळ्या अपेक्षा असतात त्यामुळे Project Manager ला कंपनीच्या वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते.एका असफल प्रोजेक्ट मॅनेजमेंट मुळे एका मोठ्या कंपनीला किती मोठा झटका लागू शकतो याचे जिवंत उदाहरण खाली तुम्ही पाहू शकता-
Coca-Cola कंपनीने प्रतिस्पर्ध्यांच्या दबावाला तोंड देण्यासाठी 1985 मध्ये त्यांची रेसिपी अपडेट करण्याचा निर्णय घेतला.
प्रत्येक कंपनीची वेगवेगळी स्टाईल, वागणूक आणि वेगवेगळा दृष्टिकोन असतो. जवळ जवळ सर्वच कंपन्या Project Manager ने स्वतःकडे असलेले उत्तम नॉलेज आणि दांडगा अनुभव वापरून नवीन गोष्टी निर्माण आणि सुरू करण्याची अपेक्षा बाळगतात.
काही कंपन्यांसाठी असे Project Manager फायदेशीर ठरतात ज्यांची पर्सनॅलिटी रफ आणि टफ असेल थोडक्यात जे अडथळांना एकदम जागोजागी निर्णय घेऊन पार करू शकतील. तर बऱ्याच कंपन्या एखाद्या सर्जनसारखी पर्सनॅलिटी असणाऱ्या व्यक्तींना फायदेशीर ठरवू शकतात जे अडथळे आले की अगदी सावधानी बाळगून अगदी काळजीपूर्वक गोष्टी हाताळू शकतील. काही कंपन्यांना असे प्रोजेक्ट मॅनेजर गरजेचे असतात जे अगदी चपळ राहून लोकांना हवे ते काम करण्यास मनवू शकतील तर बऱ्याच कंपन्यांना अगदी शांत आणि ॲनालिटिकल प्रोजेक्ट मॅनेजर हवे असतात जे शांत राहून नीट विचार करून आणि योग्य निर्णय घेऊन पुढे सर्व चालवतील.
आणि हेच मोठे चॅलेंज Project Manager साठी असते त्यांना हे माहीत नसते कोणती कंपनी कसा विचार करते आणि कंपनीला नक्की काय हवे आहे, तर हे सर्व काम प्रत्यक्षात सुरू केल्यानंतरच त्यांना कळण्यास सुरुवात होते कारण इंटरव्यू मध्ये कंपनीला जास्त तपशील (Detail) देऊन सांगणे अशक्य असते. त्यामुळे Project Manager साठी कंपनी हेच जग असते.
जबाबदऱ्या काय असतात?| What are the responsibilities of a project manager
प्रोजेक्टचे नियोजन (Project Planning):
प्रोजेक्ट मॅनेजर हा प्रोजेक्टच्या योजनेमागील सूत्रधार असतो. तो प्रकल्पाची उद्दिष्टे समजून घेऊन आणि त्यांना स्टेप बाय स्टेप रोडमॅपमध्ये बदलतो. यामध्ये प्रोजेक्टचा स्कोप (व्याप्ती) काय असेल? प्रोजेक्ट ला किती भांडवल लागेल? किती वेळात प्रोजेक्ट पूर्ण होईल? कोणती कामे करावी लागतील? ती कोण करणार? त्यासाठी कोणते टूल्स आणि रिसोर्स ची गरज लागेल आणि प्रत्येकाला किती वेळ लागेल हे सराईतपणे ठरवण्याचे काम प्रोजेक्ट मॅनेजर करतो. तो प्लॅनिंग मध्ये प्रोजेक्टच्या बजेटचा अंदाज देखील काढतो आणि सर्वकाही ट्रॅक ठेवण्यासाठी वेळापत्रक तयार करतो.
प्रोजेक्टची अंमलबजावणी (Project Execution):
प्रोजेक्टची अंमलबजावणी मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर स्वतःच्या लीडरशिप स्किल्स वापरून प्रोजेक्ट ला पुढे नेतो. पूर्ण प्रोसेस मध्ये चांगल्या प्रकारचे कम्युनिकेशन ठेवतो. प्रोजेक्टची अंमलबजावणी नीटपणे होत आहे का त्यासोबत त्याची क्वालिटी चांगल्या प्रकारे मेंटेन राहत आहे का हे बघण्याचे मोठे काम प्रोजेक्ट मॅनेजर करतो. थोडक्यात टीम मधील प्रत्येकजण योजनेनुसार आपली भूमिका बजावत आहे का?, सर्व गोष्टी ट्रॅकवर आहेत का? आणि प्रोजेक्ट ठरवलेल्या वेळेमध्ये चालला आहे का? हे सर्व पाहण्याचे काम प्रोजेक्ट मॅनेजर करतो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची अपडेट देतो.
प्रोजेक्ट मॉनिटरिंग आणि कंट्रोल (Project Monitoring and Control):
प्रोजेक्ट मॉनिटरिंग आणि कंट्रोल हा प्रोजेक्ट मॅनेजरच्या गोष्टी कशा चालल्या आहेत यावर बारीक नजर ठेवण्याचा मार्ग आहे. प्रोजेक्ट नीटपणे पूर्ण होत आहे का यावर लक्ष ठेवण्याचे काम प्रोजेक्ट मॅनेजरच्या हातात असते त्यासोबतच प्रोजेक्टमध्ये काही बदल घडवून आणायचे असतील तर ते सुद्धा तो बघतो. त्यासोबतच जिथे रिस्क घेण्याची गरज असेलतर तिथे रिस्क घेऊन प्रोजेक्टला सांभाळून ठेवतो.
सतत सुधारणा (Continuous Improvment):
प्रोजेक्ट मॅनेजर एखाद्या टीम साठी प्रशिक्षकासारखा असतो, परंतु गेम जिंकण्याऐवजी तो नेहमी टीमवर्क सुधारण्याचे मार्ग शोधत असतो. याचा अर्थ काय चांगले काम करत आहे आणि काय नाही यावर चर्चा करण्यासाठी तो मीटिंग अरेंज करतो आणि नंतर पुढच्या वेळी गोष्टी सुरळीत आणि जलद चालवण्यासाठी ते छोटे बदल करतो. त्यामुळे प्रोजेक्टमध्ये सर्व हळूहळू चांगले होत राहते आणि प्रोजेक्ट नीटपणे परफॉर्म करण्यास सज्ज होतो.
बजेट मॅनेजमेंट (Budget Management):
बजेट मॅनेजमेंट मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर प्रोजेक्टला लागणारे भांडवल ठरवतो. त्यासोबतच प्रोजेक्ट ला जितका बजेट कंपनीने दिला असेल तितका आणि त्यापेक्षा कमी खर्चामध्ये प्रोजेक्ट चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. पुरवठा आणि लोकांचा वेळ यासारख्या प्रत्येक गोष्टीसाठी किती खर्च येईल याची योजना प्रोजेक्ट मॅनेजर तयार करतो. त्यानंतर प्रत्यक्षात किती पैसे खर्च होत आहेत हे सुद्धा तो पाहतो.
स्टेकहोल्डर मॅनेजमेंट(Stakeholder Management):
प्रोजेक्ट मध्ये वेगवेगळे स्टेकहोल्डर्स सामील असतात. प्रोजेक्ट मॅनेजर सर्वांना नीट माहिती देतो. त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेतो. जिथे त्यांना संकटांना सामोरे जावे लागत असेल तिथे पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करतो.
प्रोजेक्ट क्लोजिंग (Project Closing):
प्रोजेक्ट नीटपणे संपवण्याचे काम प्रोजेक्ट मॅनेजर करतो. अगदी ठरवलेल्या योजनेनुसार प्रोजेक्ट मधील रिझल्ट तपासतो. प्रोजेक्टचा परफॉर्मन्स किती चांगला आहे याची पडताळणी तो करतो. त्यासोबतच प्रोजेक्ट संपताना काही डॉक्युमेंटेशनचा भाग असेल तर ते सर्व करण्याची जबाबदारी प्रोजेक्ट मॅनेजरची असते.
तर मित्रांनो तुम्हाला आता प्रोजेक्ट मॅनेजर नक्की आहे तरी कोण? तो इतका गरजेचा असतो? त्याची कामे तरी कोणती आहे हे सर्व तुम्हाला लक्षात आले असेलच. तर तुम्ही सुद्धा स्वतःसाठी किंवा इतरांसाठी कामे प्लॅन करून ते प्रत्यक्षात वेळेत पूर्ण करून दाखवू शकता का? तुम्ही एक लीडर आणि उत्तम मोटिवेटर आहात का? तुमचे कम्युनिकेशन खूप चांगले आहे का? आणि ठरवलेल्या सर्व गोष्टी नीटपणे हाताळण्यामध्ये तुम्ही पटाईत आहात का? जर या सर्व प्रश्नांचे उत्तर “हो” असेल तर मित्रांनो तुम्ही सुद्धा एक उत्तम प्रोजेक्ट मॅनेजर बनू शकाल.
तर या सर्व गोष्टी समजून घ्या, त्यावर अभ्यास करा, सॉफ्ट आणि हार्ड दोन्ही प्रकारच्या स्किल्स वाढवण्यावर भर द्या ज्यामुळे तुम्ही अगदी पाहिला प्रोजेक्ट मॅनेजरचा जॉब हातामध्ये मिळवू शकता आणि मोठमोठे ऑर्गनायझेशन सोबत अगदी वेगाने बदलत चालणाऱ्या जगाला सुद्धा बदलू शकता. तर ऑल द बेस्ट हॅव अ ग्रेट करिअर!